
ठाणे : प्रतिनिधी
ठाणे महापालिका परिवहन (टीएमटी) आर्थिक अडचणीत सापडले असून विविध शासकीय कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून दिलेल्या बसगाड्यांचे सुमारे ७५ लाखांची देयके अद्याप शासनाच्या विविध विभागांकडून टिएमटीला मिळालेली नाहीत.
दरम्यान, असे असतानाच आता नवी मुंबई येथे होणाऱ्या ‘हिंद-की-चादर’ शताब्दी समागम कार्यक्रमासाठी विविध परिवहन उपक्रमांसोबत टिएमटीकडे ५० बसगाड्या देण्याची मागणी शासनाकडून करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
ठाणे महापालिका परिवहन उपक्रम हा ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर चालविण्यात येतो. टीएमटीकडे एकूण सुमारे ४०७ बसगाड्या असून त्यापैकी दररोज ३७० ते ३८० बस प्रवाशांच्या सेवेत धावतात. तसेच, शासनाच्या विविध कार्यक्रमांसाठी ‘टिएमटी’च्या बसगाड्या नेण्यात येत असून यामुळे प्रवासी सुविधेसाठी बसगाड्या अपुऱ्या पडत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.


