
ठाणे; निलेश घाग
दिवा पूर्व भागातील ‘मॉडर्न वर्ल्ड इंग्लिश स्कूल’ या अनधिकृत शाळेच्या भयंकर निष्काळजीपणामुळे इयत्ता दहावीच्या ११ विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत ‘धडाकेबाज युवा प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष अमोल केंद्रे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना धारेवर धरले असून, या बेकायदेशीर शाळेवर कठोर कारवाई करण्यासाठी सर्व प्रशासकीय स्तरांवरून अधिकृत तक्रार नोंदवली आहे.
शुक्रवारपासून (२० फेब्रुवारी) दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या. मात्र, मॉडर्न वर्ल्ड इंग्लिश स्कूलने विद्यार्थ्यांचे परीक्षेचे फॉर्मच न भरल्याने या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप आहे. अमोल केंद्रे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करत प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे वाभाडे काढले आहेत.
प्रशासनाच्या आशीर्वादानेच अनधिकृत शाळांचा सुळसुळाट?
यावेळी अमोल केंद्रे यांनी एका अत्यंत गंभीर आणि धक्कादायक बाबीकडे लक्ष वेधले आहे. मागील शैक्षणिक वर्षात प्रशासनाने एकट्या दिवा शहरातील तब्बल ८१ अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध केली होती. या अनधिकृत शाळा तात्काळ बंद न केल्यास त्यांच्यावर दररोज १०,००० रुपये दंड आकारण्यात येईल, अशी मोठी घोषणा प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र, वास्तवात यापैकी एकाही शाळेवर कारवाई झाली नाही किंवा त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला नाही.
”शिक्षण विभागाच्या याच ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळे आणि भ्रष्ट कारभारामुळे आज दिव्यामध्ये अनधिकृत शाळांचे पेव फुटले आहे. प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असून, त्याचा फटका आज या ११ निष्पाप विद्यार्थ्यांना बसला आहे. जर प्रशासनाने आधीच त्या ८१ अनधिकृत शाळांवर कारवाई केली असती, तर आज ही वेळ आली नसती,” असा घणाघाती आरोप अमोल केंद्रे यांनी केला आहे.
धडाकेबाज युवा प्रतिष्ठानच्या वतीने या संपूर्ण प्रकाराला सर्वस्वी शाळा प्रशासन आणि ठाणे महापालिकेचा शिक्षण विभाग जबाबदार आहे. मॉडर्न वर्ल्ड इंग्लिश स्कूलच्या विश्वस्तांवर त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करून शाळा कायमस्वरूपी सील करावी. तसेच, मागील वर्षी घोषित केल्याप्रमाणे दिव्याातील सर्व अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई करून त्या बंद कराव्यात. प्रशासनाने या मागणीकडे डोळेझाक केल्यास, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी ‘धडाकेबाज युवा प्रतिष्ठान’ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असा खणखणीत इशारा अमोल केंद्रे यांनी दिला आहे.
या विद्यार्थ्यांचे जुलै महिन्यात होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी फॉर्म भरून त्यांच्या परीक्षा घेतल्या जातील व कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ दिले जाणार नाही, तसेच संबंधित शाळेवर कठोर कार्यवाही करण्यात येईल – श्री. देविदास महाजन (माध्यमिक-शिक्षण अधिकारी)


