दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रकोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील शेकडो कामे अपूर्ण ; मार्ग पूर्ण होण्यासाठी दीड वर्ष लागणार

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील शेकडो कामे अपूर्ण ; मार्ग पूर्ण होण्यासाठी दीड वर्ष लागणार

रत्नागिरी ; योगेश मुळे

नागपूर – रत्नागिरी महामार्गाचा भाग
असलेल्या कोल्हापूर – रत्नागिरी या महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी प्रदीर्घ कालावधी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शेकडो कामे अपूर्ण असल्याने पावसाळ्यात ती ठप्प होणार आहेत. त्यामुळे महामार्ग पूर्ण होण्यासाठी किमान दीड वर्ष लागू शकतो.
सध्या या महामार्गावरील कोल्हापूरपासून ते रत्नागिरीपर्यंत कित्येक कामे अपूर्ण राहिलेली दिसतात. वाघबीळ येथील रुंदीकरणासह केलॅनजीकचा उड्डाणपूल, वाघबीळ दरीवरून पुढे आंबवडेच्या दिशेने जाणारा उड्डाणपूल ही कामे अपूर्ण आहेत. आंबवडेनजीक रस्त्याचीही बरीच कामे अपूर्ण आहेत. बोरपाडळेपासून पैजारवाडीच्या दिशेने जाणाऱ्या भल्यामोठ्या उड्डाणपुलाचे काम ठप्प झालेले दिसत आहे. पैजारवाडी येथील वळण रस्त्याचेही काम धिम्या गतीने सुरू असलेले दिसत आहे. पैजारवाडी-आवळी-बोरीवडे-खुटाळवाडी दरम्यानचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून ठप्प झालेले दिसत आहे, तर काही ठिकाणी मंदगतीने कामे सुरू असलेली दिसतात.
बांबवडे ते शाहूवाडी आणि शाहूवाडी ते मलकापूर या बायपास रस्त्यांची कामे कधी पूर्ण होणार, हे कुणीही सांगू शकत नाही. काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असलेले दिसत आहे. बाणेकरवाडी ते निळे दरम्यान महामार्गासह कडवी नदीवरील पुलाचे काम मंद गतीने सुरू असलेले दिसत आहे. आंबा घाट उतरून पुढे गेल्यानंतर मुर्शी-गोवरेवाडी रस्त्याचे कामही ठप्प झालेले दिसत आहे. साखरपा येथील दोन्ही पुलांची कामे थांबलेली दिसत आहेत. दाभोळे, नाणिज आणि करंजारी या मार्गावरील कित्येक कामे एकतर ठप्प झालेली किंवा धिम्या गतीने सुरू असलेली दिसतात.
या सगळ्या भागात पावसाचे प्रमाण मोठे असते. या परिसरामध्ये सातत्याने पाऊस होतो. यमुळे आणखी महिनाभरात सुरू होणाऱ्या पावसाळ्यात या मार्गावरील महामार्गाची सर्व कामे ठप्प होणार आहेत. ही कामे पुन्हा सुरू व्हायला किमान ऑक्टोबर-नोव्हेंबर उजाडावा लागणार आहे.
या महामार्गावरील उर्वरीत सगळी कामे आगामी महिनाभराच्या कालावधीत पूर्ण होणे शक्य दिसत नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात या मार्गावरील वाहनांना कसरत करीतच वाटचाल करावी लागणार आहे. रस्त्यांची अपुरी कामे ऐन पावसाळ्यात खड्डेमय होऊन या मार्गावरील प्रवास अतिशय ‘धक्कादायक’ बनण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत. हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी आणखी किमान दीड वर्षे प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८

जाहिरात

जाहिरात

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!