
ठाणे – प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. त्यातही लहान मुलींवर अमानुष अत्याचार केले जात आहेत. अत्याचार करणाऱ्या नराधमांना फासावर लटकवावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या सुचनेनुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महिलाध्यक्ष, नगरसेविका मनिषा भगत यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा येथे कँडल मार्च काढण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन ते चार वर्षांच्या चिमुरडीवर झालेला अत्याचार आणि तिची निर्घृण हत्या या अत्यंत दुर्दैवी घटनेच्या विरोधात हा कँडल मार्च काढण्यात आला. मुंब्रा स्टेशन ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान काढण्यात आलेल्या या मार्चमध्ये शेकडो महिला – लहान मुली सहभागी झाल्या होत्या. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अत्याचारात बळी पडलेल्या चिमुकलीला आदरांजली अर्पण करून कँडल मार्चचा समारोप करण्यात आला.
यावेळी मनिषा भगत म्हणाल्या की, नसरापूर, अकोला, ठाणे येथे नराधमांनी लहान मुलींना लक्ष्य केले आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचा चौरंगा केला होता. त्याच महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत महिलांवर अन्याय होत आहे. विकसित भारत प्रगतशील भारत अशी घोषणा दिली जाते ; मात्र यामध्ये महिलांवर अत्याचार वाढत आहे. गुन्हेगाराला कोणतीही जात धर्म नसतो अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. या लहान मुलीचा काय दोष होता ? असा सवाल करताना घटनेतील नराधमाला अत्यंत कठोर शिक्षा झाली पाहिजे, याबरोबर यापुढील काळात महिलांवर कोणताही अत्याचार होणार नाही याकरता कठोर कायदे निर्माण झाले पाहिजे.


