
बदलापूर ; जान्हवी म्हात्रे
राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असून अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि तापमानातील चढ-उतार अनुभवायला मिळत आहेत. या बदलत्या हवामानाचा सकारात्मक परिणाम रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरान येथे पाहायला मिळत आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून माथेरानमध्ये सकाळच्या वेळेत थंडगार वारे, दाट धुके आणि आल्हाददायक वातावरण निर्माण झाल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सकाळच्या वेळी माथेरानमधील अनेक रस्ते आणि डोंगरदर्या दाट धुक्याने झाकल्या जात आहेत. धुक्याच्या चादरीत हरवलेले रस्ते, हिरवाईने नटलेली झाडे आणि थंडगार वाऱ्याची झुळूक यामुळे पर्यटकांना एखाद्या हिल स्टेशनमधील वेगळाच अनुभव मिळत आहे. विशेषतः मुंबई, पुणे आणि परिसरातील नागरिक उकाड्यापासून काही क्षणांचा दिलासा मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर माथेरानकडे वळत आहेत.
माथेरानमधील पॉईंट्सवर सकाळी फिरताना पर्यटक सेल्फी आणि फोटोग्राफीचा आनंद घेताना दिसत आहेत. चार्लोट लेक, पॅनोरमा पॉईंट, लुईसा पॉईंट आणि इको पॉईंट परिसरात पर्यटकांची विशेष गर्दी वाढली आहे. अनेक पर्यटक घोडेस्वारी, जंगलातील फेरफटका आणि निसर्ग निरीक्षणाचा आनंद घेत आहेत.
स्थानिक व्यावसायिकांच्या मते, एप्रिल आणि मे महिन्यात वाढणाऱ्या उष्णतेमुळे काही प्रमाणात पर्यटकांची संख्या घटली होती. मात्र आता वातावरणात गारवा निर्माण झाल्याने हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि स्थानिक व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. विकेंडच्या काळात पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.


