
नाशिक; निशांत घोरपडे
म्हाडा व महसूल विभागाशी संबंधित बहुचर्चित घोटाळ्यात पोलिसांनी अखेर कारवाई करत अप्पर नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक केली. सुमारे १५० कोटी रुपयांच्या या प्रकरणामुळे शहरासह राज्यभरात खळबळ उडाली आहे.
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, तुकडे बंदी कायद्याचा गैरवापर करून एक एकर भूखंडांचे नियमबाह्य विभाजन करण्यात आले. यामुळे आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या २० टक्के सदनिकांची विक्री बांधकाम व्यावसायिकांना करण्याचा मार्ग मोकळा झाला. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणावर यापूर्वी विधिमंडळातही चर्चा झाली होती.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची घोषणा केली. महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून, आता पोलिसांनी कारवाईला वेग दिला आहे.
या घोटाळ्यात एकूण १९४ जणांविरोधात गुन्हा दाखल असून, त्यात ४९ बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे. काही संशयितांना यापूर्वी अटक करण्यात आली असून अनेकांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.
दरम्यान, या प्रकरणात महापालिका व इतर संबंधित यंत्रणांमधील अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



