
ठाणे ; निलेश पांडुरंग घाग
ठाणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठाणे पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कार्यतत्परता सिद्ध केली आहे. वागळे इस्टेट परिसरात घरफोडी व मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा, घटक ५ यांनी अत्यंत शिताफीने कारवाई करत विविध कंपन्यांचे एकूण ३० महागडे मोबाईल जप्त केले असून एका सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे. या धाडसी कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात चांगलीच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कासारवडवली पोलीस ठाण्यात नोंद गुन्हा क्रमांक १०२/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४), ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा, घटक ५ यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत संशयित आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीने चोरी केलेले मोबाईल ठाणे परिसरातील विविध ठिकाणी विक्रीसाठी ठेवल्याची माहिती उघडकीस आली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत विविध कंपन्यांचे सुमारे ₹५,२९,१०१/- किंमतीचे ३० मोबाईल जप्त केले. आरोपीकडून पुढील तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सदर कारवाई ही पोलीस उपायुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त व गुन्हे शाखा घटक ५ च्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी पद्धतीने पार पाडली. या वेगवान आणि परिणामकारक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून गुन्हेगारांमध्ये मात्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठाणे पोलिसांच्या या प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून, “गुन्हेगार कुठेही लपले तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाहीत,” असा ठाम संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठाणे पोलीस दल सातत्याने दक्ष असून, नागरिकांनीही संशयास्पद हालचालींबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे



