
रत्नागिरी ; प्रतिनिधी
रत्नागिरी रायगड जिल्ह्यांतील रुग्णांचा सहभाग
चिपळूण, ता. ६ : वालावलकर रुग्णालय, डेरवण येथे सेरेब्रल अँजिओग्राफी व स्ट्रोक व्यवस्थापन शिबिर तसेच कार्यशाळा यांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातून रत्नागिरी आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांतील एकूण ७५ रुग्णांनी लाभ घेतला.
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे ब्रेन हेमोरेज, लकवा, मेंदूच्या रक्तवाहिन्यांचे विकार यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे यामागील प्रमुख कारणे ठरत असून एकदा लकवा झाल्यास संपूर्ण कुटुंबावर त्याचा मोठा परिणाम होतो. मात्र आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे या आजारांवर तातडीचे आणि प्रभावी उपचार शक्य झाले आहेत.
मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयातील न्यूरोसर्जरी विभाग प्रमुख डॉ. नितीन डांगे, तसेच न्यूरो सर्जन डॉ. मयूर घरात आणि डॉ. कुशल भाटिया यांनी या शिबिराला भेट देत रुग्णांसोबत जनजागृती केली. तसेच कोकणातील रुग्णांना अत्याधुनिक उपचार कसे उपलब्ध करून देता येतील याबाबत स्थानिक डॉक्टरांना मार्गदर्शन केले.
या शिबिरात ५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्याशिवाय २५ जणांची स्वतंत्र तपासणी करून त्यातील २ रुग्णांवर मेंदूची अँजिओग्राफी करण्यात आली. यासाठी रुग्णालयातील अत्याधुनिक डिजिटल सब-ट्रॅक्शन अँजिओग्राफी (DSA) लॅबचा वापर करण्यात आला.
डॉक्टरांच्या मते, रुग्णाला अचानक हात-पाय सुन्न होणे, बोलण्यात अडचण, तोंड वाकडे होणे, तीव्र डोकेदुखी अशी स्ट्रोकची लक्षणे दिसल्यास चार तासांच्या आत रुग्णालयात दाखल झाल्यास अँजिओग्राफीद्वारे ब्लॉक झालेली रक्तवाहिनी ओळखता येते आणि तातडीने उपचार केल्यास लकव्यापासून वाचण्याची मोठी शक्यता असते.
या कार्यक्रमात जनरल प्रॅक्टिशनर्स, बीएचएमएस डॉक्टर तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित कार्यशाळेला १४५ जणांनी उपस्थिती लावली. नवीन तंत्रज्ञानामुळे स्ट्रोकचा धोका असलेल्या रुग्णांसाठी मोठे आशादायक पाऊल ठरेल, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.
जाहिरात



