
ठाणे; विशेष प्रतिनिधी

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात जुन्या पैशांच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशाल पटेकर हा आपल्या मित्रांसोबत एका मित्राला लोकलमध्ये बसवण्यासाठी ठाणे स्थानकात गेला होता.
यावेळी त्याच्या ओळखीचा एक अल्पवयीन मुलगा त्याला भेटला. रेल्वे ट्रॅकजवळ बोलत असताना जुन्या आर्थिक व्यवहारावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर अल्पवयीन आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला केला.
अनमोल या तरुणाला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या विशाल पटेकरवरही वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या विशालला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.



