

ठाणे ; सुशांत पाटील
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचा एक मोठा अपघात सुदैवाने टळला आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवरून लग्नासाठी मुरबाडला जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर कल्याण परिसरात अचानक आलेल्या वादळात अडकले. मात्र, पायलटच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही आणि हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप आहेत. या थरारक घटनेनंतर हेलिकॉप्टरचे जुहू एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

लग्नासाठी मुरबाडला जाताना कल्याणमध्ये वादळाचा फटका
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका लग्नाला उपस्थित राहण्यासाठी महालक्ष्मी रेसकोर्सवरून हेलिकॉप्टरने मुरबाडला जाण्यासाठी निघाले होते. त्यांचे हेलिकॉप्टर कल्याण परिसरात पोहोचले असता, तिथे हवामान बदलले आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला. त्यामुळे हेलिकॉप्टर वादळात अडकले. तब्बल १० ते १५ मिनिटे हेलिकॉप्टर वादळाचा सामना करत होते. कल्याण-डोंबिवली परिसरात सध्या हवामान खराब असून सोसाट्याचा वारा वाहत आहे, ज्याचा फटका शिंदेंच्या प्रवासाला बसला.



