
ठाणे; प्रतिनिधी
२८ टक्के काम पूर्ण, दोन वर्षांत सेवेत
खारीगाव ते गायमुख दरम्यान उभारला जात असलेला १३ किमी लांबीचा कोस्टल रोड प्रकल्प हा ठाण्याच्या विकासाला नवी दिशा देणारा गेम चेंजर ठरणार आहे. आज एमएमआरडीएचे मुख्य अभियंता, कंत्राटदार कंपनीचे अधिकारी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत बाळकुम येथे प्रकल्पाची पाहणी करून कामाचा सविस्तर आढावा घेतला.
सध्या प्रकल्पाचे सुमारे २८ टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर २०२८ पर्यंत हा महत्त्वाकांक्षी मार्ग ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. खारीगाव, बाळकुम ते गायमुख असा ठाणे खाडीच्या काठाने जाणारा हा सहा पदरी मार्ग सुमारे २,७२७ कोटी रुपयांच्या खर्चातून उभारला जात आहे.
या प्रकल्पामुळे खारीगाव ते गायमुख प्रवासाचा वेळ तब्बल ४५ मिनिटांवरून केवळ १५ मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. तसेच मुंबई-नाशिक महामार्ग, जेएनपीटी, वाढवण बंदर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने होणाऱ्या मालवाहतुकीला जलद व सक्षम जोडणी मिळणार असल्याने हा मार्ग ठाण्यासह संपूर्ण प्रदेशाच्या आर्थिक विकासालाही गती देणार आहे.
घोडबंदर रोडवरील अवजड वाहनांची वाहतूक आणि सततची कोंडी हा ठाणेकरांच्या दैनंदिन आयुष्यातील मोठा प्रश्न बनला आहे. कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर या वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि कळवा तसेच अंतर्गत भागांतील वाहतुकीलाही मोठा दिलासा मिळेल.
प्रकल्पाच्या काही भागात कांदळवन क्षेत्रातून एलिव्हेटेड रोड उभारण्यात येत आहे. पाहणीदरम्यान या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि मातीचा भराव झाल्याचे निदर्शनास आले. ही अतिक्रमणे प्रकल्पासाठी अडथळा ठरू शकतात. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करून अडथळे दूर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. विकासकामे करताना पर्यावरण संवर्धनालाही तितकेच महत्त्व दिले जाईल, यावर भर देण्यात आला.
यावेळी संजय पाटील, सुरज दळवी, जितेंद्र मढवी तसेच एमएमआरडीए आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते..



