दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रगुन्हेगारीशाळकरी मुलीवर मातृत्व लादणाऱ्या आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीसह दंड

शाळकरी मुलीवर मातृत्व लादणाऱ्या आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीसह दंड

चिपळूण :- तालुक्यातील एका १३ वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिला जीवे ठार मारण्याची धमकी देणारा आरोपी वैभव सुरेश पालशेतकर (वय ३७ वर्षे, राहणार चिपळूण) याला चिपळूण येथील विशेष न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी २० वर्षे सक्तमजुरी व १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
आरोपी वैभव पालशेतकर याने मार्च २०१९ मध्ये संध्याकाळी ६ वा. च्या सुमारास गावात साखर आणण्यासाठी जात असलेल्या शाळकरी मुलीला निर्जन पुलावर अडविले. आरोपीने जबरदस्तीने तिला बाजुला नेत तिचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. तसेच बलात्कार करुन झाल्यानंतर ही घटना कोणालाही सांगितल्यास मारुन टाकण्याची तिला धमकी दिली. भीतीपोटी मुलीने ही घटना कोणालाच सांगितली नाही. परंतु, जुलै २०१९ मध्ये पीडित मुलीच्या आईला मुलीची
तब्येत स्थूल वाटत असल्याने तिने तिला चिपळूण येथील हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेले. तेथील डॉक्टरांनी मुलीची सोनोग्राफी करावी लागेल, असे सांगितले. पीडित मुलीला तिच्या आईने अश्विनी हॉस्पिटल मुंबई येथे नेले. सोनोग्राफीमध्ये पीडित मुलगी १९ आठवड्याची गरोदर आढळून आली. पीडितेच्या आईने पीडित मुलीस विश्वासात घेऊन विचारणा केली असता, तिने आरोपी वैभव पालशेतकर याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सांगितली. पीडितेच्या आईने तत्काळ कफ परेड पोलीस ठाणे मुंबई येथे तक्रार दिली. परंतु, गुन्हा चिपळूण पोलीस ठाणेच्या हद्दीत घडलेला असल्यामुळे तो चिपळूण पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. त्यानंतर चिपळूण पोलिसांनी सखोल तपास करुन आरोपी विरुध्द भा.दं.वि. कलम ३७६ (३), ५०६ तसेच पोक्सो कायदा कलम ४, ६, ८, १२ अन्वये चिपळूण येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
खटल्याची सुनावणी चिपळूण येथील विशेष न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांच्यासमोर सुरु झाली. गुन्हा शाबीत करण्यासाठी सरकार पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदारांची महत्त्वपूर्ण साक्ष अभिलेखावर आणली. पुराव्याअंती विशेष न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य धरुन १३ वर्षाच्या मुलीवर मातृत्व लादणारा नराधम आरोपी वैभव पालशेतकर याला भा.दं. वि. कलम ३७६ (३), ५०६ पोक्सो कायदा कलम ४, ६, ८,१२ अन्वये दोषी ठरवून २० वर्षे सक्तमजुरी व १ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास १ वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!