
ठाणे : निलेश घाग
मुंबई-नाशिक महामार्ग,घोडबंदर, मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा या सारख्या मागाँचे जाळे आहे. त्यामुळे तस्करांना रस्ते मार्गे अमली पदार्थांची तस्करी करणे व भिवंडीतील गोदामांमध्ये त्याचा साठा करणे शक्य होत असल्याचे बोलले जात आहे.भिवंडी, नवी मुंबई, मुंब्रा-शिळफाटा भागात मोठ्या प्रमाणात गोदामे आहेत. उरण जेएनपीए, गुजरात येथून सुटणारी हजारो मालवाहू वाहने भिवंडी, मुंब्रा, नवी मुंबई शहरातील गोदामांत दाखल होत असतात. भिवंडी भागात अनेक गोदामे बेकायदा पद्धतीने उभारण्यात आले आहेत.
जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) तब्बल १,७४५ कोटी किमतीचे कोकेन जप्त केले. या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही एनसीबीच्या पथकाचे कौतुक केले. ही कारवाई ठाणे जिल्ह्यातील भिवंडी व नवी मुंबई शहरात झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. भिवंडीतील एका गोदामात हा साठा आढळून आला.
अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) ऑपरेशन ‘व्हाईट स्ट्राईक’ अंतर्गत अमली पदार्थांच्या संघटित तस्करीविरुद्ध कारवाई केली. त्यात कोकेनच्या तस्करीचे मोठे जाळे उघडकीस आले. या कारवाईसाठी गेले सहा महिने एनसीबीचे पथकाने गुप्त व्यवस्था तयार केली होती. तसेच तस्करांच्या सर्व हालचालींवर सातत्याने पाळत ठेवून होते. त्यानंतर पथकाने नवी मुंबईतील कळंबोली व भिवंडीतील राहनाळ भागात छापे टाकले. काही दिवसांपूर्वीच ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत टिटवाळा येथे मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला होता. या छाप्यात अश्विनी पॉल हिला अटक करण्यात आले. तिच्या घरामधून पाच ते सहा कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. तर मिरा भाईंदरमध्येही तरुण ‘झॉम्बी’ प्रमाणे फिरत असल्याचे आढळून आले.
शहरात ‘झॉम्बी ड्रग्ज’ची विक्री होत असल्याचे उघड झाले होते. नवी मुंबईत अनेकदा आफ्रिकन नागरिकांचा अशा गुन्ह्यात सहभाग असल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांना वारंवार संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

जाहिरात



