
मुंबई :- राज्यात उष्णतेचा तडाखा कायम असतानाच काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने ६ मे रोजी पाच जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे, तर दोन जिल्ह्यांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. सोलापूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये अलर्ट नसला तरी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हवामान मुख्यतः उष्ण आणि कोरडे राहणार आहे. जाणून घेऊयात विभागानुसार हवामानाचा अंदाज.
कोकण विभागात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार असून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे उष्णतेचा यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. या भागात कमाल तापमान ३४ ते ३७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून किमान तापमान २६ ते २९ अंशांपर्यंत नोंदवले जाऊ शकते. दमट हवामानामुळे उकाड्याची तीव्रता अधिक वाढणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये हवामान मुख्यतः कोरडे राहण्याचा अंदाज आहे. पुण्यात कमाल तापमान सुमारे ३९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ अंशांच्या आसपास राहू शकते. काही भागांमध्ये दुपारच्या वेळेत उष्ण वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सोलापूर जिल्ह्यात मात्र वातावरणात काही प्रमाणात बदल दिसून येणार आहे. येथे कुठलाही अधिकृत अलर्ट नसला तरी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमाल तापमान ४० अंशांच्या आसपास राहू शकते तर किमान तापमान २५ अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा पाहायला मिळेल. नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर परिसरात देखील कमाल तापमान ३८ – ४० अंशांच्या दरम्यान तर किमान तापमान २४ अंशांवर राहील.
मराठवाड्यात धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या भागात कमाल तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. नांदेडमध्येही हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज असून वातावरणात उकाडा कायम राहणार आहे.
विदर्भात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळसह बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे आणि उष्ण राहण्याचा अंदाज आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून किमान तापमान २७ अंशांच्या आसपास राहू शकते. दुपारच्या वेळेत उष्णतेची लाट अधिक तीव्र जाणवण्याची शक्यता आहे.
राज्यातील बहुतांश भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम राहणार असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पुरेसे पाणी पिणे, हलके कपडे वापरणे आणि थेट उन्हात जाणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.


