
ठाणे ; सुशांत पाटील
ठाण्यात शिधावाटप भरारी पथकाने वंडर मॉल परिसरातील ‘डॉमिनोज पिझ्झा’ स्टोअरवर धाड टाकून सुमारे ४.५९ लाख रुपयांचा गॅस सिलेंडर साठा जप्त केला आहे.
नियंत्रक शिधावाटप कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईदरम्यान स्टोअरच्या तळघरात विविध तेल कंपन्यांचे एकूण १४० सिलेंडर आढळून आले, ज्यामध्ये ‘एचपीसीएल’, ‘बीपीसीएल’, ‘आयओसी’ आणि ‘गो गॅस कंपनी’चे सिलेंडर समाविष्ट होते. त्यापैकी ५५ सिलेंडर भरलेले तर ८५ रिकामे असल्याचे स्पष्ट झाले असून सर्व साठा सीलबंद करण्यात आला आहे.

या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेऊन चितळसर पोलिसांच्या हवाली करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे. व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा नियमबाह्य वापर होत असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढील काळातही कठोर पावले उचलली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८
जाहिरात



