
ठाणे ; विशेष प्रतिनिधी
मान्यतेची आवश्यक कागदपत्रे न सादर करता शाळा सुरू ठेवल्याप्रकरणी डोंबिवलीतील भोपर परिसरातील ‘लिटल स्टेप’ शाळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुनीता मोटघरे यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात आली. शाळेकडून बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्काचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे.
पंचायत समिती शिक्षण विभागाने तपासणीदरम्यान संबंधित शाळेकडे मान्यतेची कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. तसेच, केवळ बालवाटिका वर्ग चालवण्याची माहिती देण्यात आली असतानाही प्रत्यक्षात प्राथमिक वर्गही सुरू असल्याचे निरीक्षणात स्पष्ट झाले. यापूर्वी शाळेला नोटीस देऊन ती तात्काळ बंद करण्याचे आणि विद्यार्थ्यांना जवळच्या शासनमान्य शाळांमध्ये स्थलांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, ही नोटीस स्वीकारण्यासही शाळा प्रशासनाने नकार दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली परिसरात अशा एकूण सहा अनधिकृत शाळा कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. काही ठिकाणी मान्यता प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच शाळा सुरू करून पालकांकडून शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने अशा शाळांविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.



