
ठाणे; विशेष प्रतिनिधी
शहर विकास विभागातील आगीमुळे खळबळ; यूपीएस, कागदपत्रे जळाल्याची माहिती, तर महत्त्वाच्या फाईल्स सुरक्षित असल्याचा पालिकेचा दावा

ठाणे महापालिकेच्या मुख्यालयातील शहर विकास विभागात सोमवारी सकाळी लागलेल्या आगीमुळे संपूर्ण शहरात चर्चांना उधाण आले आहे. चौथ्या मजल्यावरील या विभागात आग लागल्यानंतर अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांचे काय झाले, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासनाने महत्त्वाच्या फाईल्स सुरक्षित असल्याचा दावा केला असला, तरी “नेमके काय जळाले?” याबाबत नागरिक आणि राजकीय वर्तुळातून संशय व्यक्त केला जात आहे.
पाचपाखाडी येथील महापालिका मुख्यालयातील शहर विकास विभागात सकाळी ८.०७ वाजण्याच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, सुरक्षा कर्मचारी आणि विद्युत विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांच्या मार्गदर्शनाखाली आग विझविण्याचे काम हाती घेण्यात आले.
सुमारे अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी ८.३५ वाजता आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शहर विकास विभागासारख्या संवेदनशील विभागात आग लागल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार यूपीएस प्रणाली, काही कागदपत्रे आणि छतावरील पंखा आगीत जळाला आहे. मात्र, याच विभागात शहरातील विकास आराखडे, बांधकाम परवानग्या, आरक्षणे आणि विविध प्रकल्पांशी संबंधित महत्त्वाच्या फाईल्स असल्याने त्या सुरक्षित आहेत का, यावरून चर्चांना उधाण आले आहे.
पालिकेकडून सर्व महत्त्वाच्या फाईल्स सुरक्षित असल्याचे सांगितले जात असले तरी आगीचे नेमके कारण काय, कोणती कागदपत्रे नुकसानग्रस्त झाली आणि या घटनेमागे केवळ तांत्रिक बिघाड आहे की अन्य काही कारण, याचा तपास होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
शहर विकास विभागातील ही आग केवळ अपघात होता की त्यामागे काही वेगळे कारण आहे? याचे उत्तर तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

जाहिरात



