
रत्नागिरी :- योगेश मुळे
रेल्वे सुरक्षा दलाची धडाकेबाज कारवाई रेल्वे मार्गावरून होणाऱ्या अवैध मद्यवाहतुकीला आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल (RPF) सातत्याने दक्षता घेत असून, त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. ‘ऑपरेशन सतर्क’ अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत धावत्या रेल्वेतून गोवा निर्मित दारूच्या तब्बल ५६० लहान बाटल्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेचे आणि कर्तव्यदक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ७ जून २०२६ रोजी ट्रेन क्रमांक १६३१२ मध्ये तिकीट परीक्षक हरकेश मीणा हे नियमित तपासणी करत असताना बी-२ आणि बी-३ डब्यांमधील स्वच्छतागृहाजवळ दोन संशयास्पद बेवारस ट्रॉली बॅग आढळून आल्या. त्यांची तपासणी केली असता त्या बॅगमध्ये गोवा निर्मित मद्याचा मोठा साठा असल्याचे उघड झाले.
हा मद्यसाठा आणि पंचनामा पुढील कारवाईसाठी रेल्वे सुरक्षा दल पोस्ट, रत्नागिरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत संपूर्ण मद्यसाठा जप्त केला आणि पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग, शहर शाखा रत्नागिरी यांच्या ताब्यात दिला. रेल्वे प्रशासन, तिकीट परीक्षक आणि आरपीएफ यांच्यातील समन्वयामुळे ही कारवाई यशस्वी झाली. रेल्वे मार्गाचा वापर करून – होणाऱ्या अवैध मद्यवाहतुकीवर प्रभावी अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

जाहिरात



