दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रसातारा शहर पोलिसांची मोठी कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह अवैध दारू वाहतूक करणारी...

सातारा शहर पोलिसांची मोठी कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह अवैध दारू वाहतूक करणारी कार जप्त


सातारा ; प्रतिनिधी

सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवैध दारू विक्री आणि वाहतुकीवर कडक कारवाई करत एक मोठा साठा जप्त केला आहे. सातारा शहराचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक कार्यरत असताना, एका गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती प्राप्त झाली.

​शहरातील शाहू चौक ते पोवई नाका दरम्यान असलेल्या चैतन्य कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटसमोरील रस्त्यावर एका ‘इको’ कारमधून (क्रमांक MH 11 DA 3160) मोठ्या प्रमाणात व्हिस्की व बिअरची अवैध वाहतूक केली जाणार असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे ए.पी.आय. अविनाश माने व त्यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचून सदर कार ताब्यात घेतली. वाहनाची कसून तपासणी केली असता, त्यामध्ये स्वतःच्या फायद्यासाठी विक्रीच्या उद्देशाने नेले जाणारे दारूचे एकूण २७ बॉक्स आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत दारूसाठा आणि वाहन असा एकूण ४,४९,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

​या प्रकरणी आरोपी प्रताप विजय बाबर (वय ३०, रा. सदर बाजार, सातारा; मूळ रा. किकली, ता. वाई) याच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, सपोनि अविनाश माने, पोउनि सुधीर मोरे आणि त्यांच्या पथकातील अंमलदार निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, प्रवीण कडव, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, मच्छिंद्रनाथ माने, संतोष घाडगे, सुशांत कदम आणि सचिन रिटे यांनी पार पाडली. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!