दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रकासार वडवली हिरानंदानी इस्टेटमधील दुचाकी चोरीचा पर्दाफाश; सराईत चोरट्यांच्या टोळीला अटक, ९...

कासार वडवली हिरानंदानी इस्टेटमधील दुचाकी चोरीचा पर्दाफाश; सराईत चोरट्यांच्या टोळीला अटक, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

ठाणे ; निलेश पांडुरंग घाग

हिरानंदानी इस्टेट परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या दुचाकी चोरीच्या मालिकेचा कासारवडवली पोलिसांनी यशस्वी छडा लावत तीन जणांच्या टोळीला अटक केली आहे. या कारवाईत आठ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून सुमारे ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक आरोपींमध्ये ७० हून अधिक वाहनचोरीच्या गुन्ह्यांत नाव असलेला सराईत गुन्हेगार मिलींद सावंत याचाही समावेश आहे.

हिरानंदानी इस्टेट परिसरातून विशेषतः रॉयल एनफिल्ड हंटर आणि सुझुकी बर्गमन या दुचाकी चोरीला जात असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर कासारवडवली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी हिरानंदानी इस्टेट, घोडबंदर रोड, मीरा रोड, दहिसर, कांदिवली, अंधेरी आणि सांताक्रूझ परिसरातील तब्बल १२० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यातून आरोपींचा माग दहिसर-कांदिवली परिसरापर्यंत पोहोचला.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ७ मे रोजी सांताक्रूझ येथे सापळा रचून सोहेल अब्दुल शेख (२१) याला अटक केली. त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आणि तीन गुन्ह्यांची उकल झाली. पुढील चौकशीत टोळीचा सूत्रधार मिलींद मनोहर सावंत (३०) असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा मुंबईसह कोकण आणि बंगळुरू परिसरात शोध घेतल्यानंतर ९ जून रोजी दहिसर येथे त्याला अटक करण्यात आली. त्याच्या कबुलीजबाबावरून भुषण दिगंबर पुरी उर्फ राम गोस्वामी (४६) यालाही नालासोपारा येथून अटक करण्यात आली.

पोलिस तपासात आरोपींची चोरीची पद्धतही उघड झाली. रस्त्याच्या कडेला हँडल लॉक न करता उभ्या केलेल्या दुचाकी आरोपी हेरत असत. वाहन काही अंतरावर ढकलून नेल्यानंतर वायर कटरच्या साहाय्याने मुख्य वायर तोडून इलेक्ट्रिक फ्यूज जोडून वाहन सुरू केले जात असे. त्यानंतर चोरीची वाहने मीरा रोड परिसरात काही दिवस लपवून ठेवली जात. वाहनाचा कोणी शोध घेत नसल्याची खात्री झाल्यावर आरोपी बनावट कागदपत्रे आणि नंबर प्लेट तयार करून ऑनलाइन अॅपद्वारे त्यांची विक्री करत असत. ग्राहकांना वाहनाची नोंदणी करून देण्याचे आश्वासन दिले जात असे; मात्र त्यानंतर आरोपी मोबाईल क्रमांक बंद करून संपर्क तोडत असल्याचे तपासात समोर आले.

या कारवाईत पोलिसांनी आठ दुचाकी, सहा मोबाईल फोन, एक टॅब, १४ सिमकार्ड, इलेक्ट्रिक फ्यूज आणि इतर साहित्य असा एकूण सुमारे ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आणखी काही वाहनचोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, पोलीस उपनिरीक्षक नितीन हांगे, मनिष पोटे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

दरम्यान, नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करून योग्यरीत्या लॉक करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

जाहिरात

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!