
रत्नागिरी ; प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर यांच्यातील अंतर आता ५० किलोमीटरने कमी होणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या केबल स्टेड पुलाचे काम पूर्ण झाले असून पावसाळ्यानंतर हा पूल लोकांच्या सेवेत दाखल होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच या पुलाच्या कामाची पाहणी केली.
तब्बल १७५ कोटी रुपये खर्च करून मुंबईतील वरळी सागरी सेतुप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारचा केबल स्टेड पूल प्रथमच उभारला जात आहे. तापोळा ते कोकणच्या दिशेला गाढवली असा हा पूल बांधण्यात आला आहे. ५४० मीटर लांब आणि १४ मीटर रुंद असलेल्या या पुलाच्या मध्यभागी ४३ मीटर उंचीची व्ह्यू गॅलरी देखील उभारली आहे. या गॅलरीमध्ये जाण्यासाठी कॅप्सुल लिफ्टची सुविधा असेल. तसेच दोन्ही बाजूनी जिन्याचे मार्गही असतील. या प्रकल्पाचे काम टी अँड टी या कंपनीकडे देण्यात आले आहे.
शिवसेना-भाजप युतीच्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना या पुलाचे काम प्रस्तावित होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर या कामाला गती दिली. पुलामुळे रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी पोलादपूरचा आंबेनाळी घाट मार्ग वाचणार आहे. खेड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या रघुवीर घाट मार्गावर बामणोली ते आपटी हा आणखी एक पूल उभारला जात आहे.
एकनाथ शिंदे यांचे गाव असलेले सातारा जिल्ह्यातील दरे हे गाव कोयना खोऱ्यातील बामणोली गाव यांना जोडणारा आणखी एक ३०० कोटी रुपये खर्च करून पूल उभारण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना, खांदाटी खोऱ्यात राहणाऱ्या नागरिकांना या पुलाचा मोठा उपयोग होणार आहे. पावसाळ्यात धोकादायक ठरणारा कोयना बॅकवॉटरमधील बार्जचा प्रवासही या पुलामुळे टाळता येणार आहे.


