
ठाणे ; विशेष प्रतिनिधी
डोंबिवली शहरात स्वस्त घरांचे आमिष दाखवत शेकडो नागरिकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संरक्षण खात्याच्या अखत्यारीतील जमिनीवर अनधिकृत बांधकाम करून मध्यमवर्गीय नागरिकांकडून लाखो रुपये उकळल्याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणामुळे घराचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक कुटुंबांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीजवळील खोणी धामटण परिसरात ‘साई माऊली कन्स्ट्रक्शन’च्या नावाखाली आरोपी मनोज धुमाळ आणि सचिन सुर्वे यांनी व्यवसाय सुरू केला होता. त्यांनी संरक्षण खात्याच्या मालकीच्या जागेवर तीन खोल्यांचे अनधिकृत बांधकाम करून ते ‘सॅम्पल हाऊस’ म्हणून ग्राहकांना दाखवले. कमी किमतीत घर मिळत असल्याचे सांगून अनेक गरजू नागरिकांकडून दोन ते चार लाख रुपये उकळण्यात आले.
प्राथमिक तपासात जवळपास २०० ते २५० नागरिकांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारीनंतर मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून सापळा रचत दोन्ही आरोपींना अटक केली. न्यायालयाने आरोपींना १९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आर्थिक व्यवहार आणि बनावट कागदपत्रांची सखोल चौकशी सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. सरकारी किंवा संरक्षण खात्याच्या जमिनीवरील प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी रेरा नोंदणी, जमिनीचे मालकी हक्क आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



