
पाणी पुरवठा दुषित होण्याची भीती, तातडीने पाणीपुरवठा केला बंद
खेड :- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणे येथील जगबुडी पुलाजवळ आज लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीचा रसायन वाहतूक करणारा टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला . या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. हा अपघात आज दुपारी दीड वाजता झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, लोटे औद्योगिक वसाहतीतून रसायन घेऊन निघालेला टँकर भरणे नाका परिसरातून जात असताना भरणे जगबुडी पुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टँकर उलटला. अपघातानंतर टँकरमधील रसायन नदीपात्रात सांडू लागल्याने परिसरात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून टँकर बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, जखमी चालकाला रुग्णवाहिकेतून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
टँकरमधील इथेनॉल केमिकल गळती होऊन ते थेट जगबुडी नदीत मिसळल्याने पर्यावरण आणि पाणीपुरवठ्यावर गंभीर धोका निर्माण झाला आहे. यामुळे खेड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. खेड शहर व आजूबाजूच्या गावातील पाणी पुरवठा दुषित होण्याची भीती असल्याने खेड नगरपरिषदेने तातडीने पाणीपुरवठा बंद केला आहे.


