
कल्याण; मंगेश सावंत
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत यंदा ३१ मार्च अखेर मालमत्ता विभागाकडून सुमारे ४३१ कोटी रुपयांची कर वसुली करण्यात आली असून ही वसुली ८६ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. कर भरण्यासाठी पालिकेकडून करण्यात आलेल्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
मात्र, दुसरीकडे महापालिका हद्दीतील ४० हून अधिक बिल्डरांकडून ओपन लँड टॅक्स अद्यापही न भरल्याची बाब समोर आली आहे. या बिल्डरांकडून जवळपास २९ कोटी रुपयांची थकबाकी येणे अपेक्षित असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
शहरात अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना, अधिकृत प्रकल्पांशी संबंधित बिल्डरांकडूनच कोट्यवधी रुपयांची थकबाकी राहिल्याने प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे. नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळूनही मोठ्या थकबाकीदारांकडून वसुली रखडल्याने महसुलावर परिणाम होत असल्याचे दिसत आहे.


