
ठाणे : निलेश घाग
‘कैसे हराया’ या एका संवादामुळे राज्यभरात लोकप्रिय झालेली ठाणे महापालिकेची एमआयएम पक्षाची नगरसेविका सहर शेख हिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्तांकडे तिने रीतसर तक्रार केली असून सुरक्षेची मागणी केली आहे.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक ३० मधून एमआयएमच्या तिकीटावर सहर शेख विजयी झाली आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला हरवून सहर शेखने महापालिकेत पाऊल ठेवले. सध्या बनावट जात प्रमाणपत्राच्या आरोपांनी ती वादात सापडली आहे. आजच पत्रकार परिषद घेऊन तिने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
सहर शेख हिला गोळी मारण्याची, बलात्कार करण्याची धमकी मिळालेली आहे. विविध माध्यमातून मला धमक्या आलेल्या आहेत, असे सहरने सांगितले. यासंदर्भात तिने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे रीतसर तक्रार केली आहे. या तक्रारीच्या माध्यमातून तिने पोलीस आयुक्तांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. मी एमआयएम पक्षाची युवा नगरसेविका असून मला पक्षाच्या कामानिमित्त राज्यभरात फिरावे लागते. अगदी देशाभरातही पक्षकामानिमित्त जावे लागते. त्यामुळे मला सुरक्षा पुरविण्यात यावी, असे सहरने पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटली आहे.
सहर शेख ही एमआयएम पक्षाची नगरसेविका आहे. तिचे वडील युनिस शेख हे राष्ट्रवादीचे माजी मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर कार्यकर्ते होते. मात्र महापालिकेला तिकीट देण्यास आव्हाड यांनी असमर्थता दर्शवल्याने युनिस शेख दुखावले गेले. पुढच्या काही दिवसांत त्यांनी एमआयएम पक्षात प्रवेश करून जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नाजिब मुल्ला यांना आव्हान देऊन लेकीला निवडून आणले. उच्च विद्या विभूषित असलेली सहर पहिल्याच प्रयत्नात नगरसेवक झाली. जिंकून आल्यानंतर विजयी सभेत कैसा हराया म्हणत ती रातोरात राज्यभर लोकप्रिय झाली.


