
‘दागिने सुरक्षित ठेवा’चा बहाणा; महिलेला ३.३० लाखांचा गंडा
ठाणे ; अभिजीत माने
ठाण्यातील कळवा येथे तीन महिलांच्या टोळीने चलाखीने फसवणूक करत शुभांगी माने (४२) यांचे सुमारे ३ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. २७ मे रोजी ज्ञानप्रसारणी शाळेजवळ एका तरुणीने स्टेशनचा रस्ता विचारला. त्यानंतर आलेल्या दोन महिलांनी परिसरात दागिने चोरीच्या घटना वाढल्याचे सांगत दागिने रुमालात ठेवण्याचा सल्ला दिला.
त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून शुभांगी यांनी मंगळसूत्र, बेलफुले आणि अंगठी काढून दिली. महिलांनी दागिने पर्समध्ये ठेवल्याचे भासवून ते लंपास केले. कळवा स्टेशनजवळ पोहोचल्यानंतर दागिने गायब असल्याचे लक्षात येताच शुभांगी यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीस आरोपी महिलांचा शोध घेत आहेत.



