
कोल्हापूर :- कोकण आणि विदर्भाला जोडणाऱ्या रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गातील आंबा ते चोकाकपर्यंतचे काम पूर्ण करण्याची मुदत मे २०२६ अखेरपर्यंत आहे. याचे आतापर्यंत काम ६३ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम या मुदतीत पूर्ण करणे आव्हानात्मक आहे. ठेकेदार कंपनीस मे अखेरपर्यंत मुदत असली तरी तीन महिने आणखी मुदतवाढ मिळू शकते, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नागपूर ते सांगलीपर्यंतचा रस्ता पूर्ण झाला आहे. सांगली ते कोल्हापूरपर्यंतचा रस्ता रखडला आहे. चोकाक परिसरातील भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. या कामाला गती येणार आहे. चोकाक ते आंब्यापर्यंतचे काम गतीने सुरू आहे. पहिल्या टप्प्यात रत्नागिरी मिऱ्याबंदर ते आंबापर्यंतचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. या टप्प्यातील काम किरकोळ राहिले आहे. सध्या आंबा घाटातील काम युद्धपातळीवर केले जात आहे.
पाऊस अधिक असल्याने पावसाळ्यात दरड कोसळत असते म्हणून आंबा घाटात दोन्ही बाजूला सुरक्षिततेसाठी जाळी लावली जात आहे. आंबा ते चोकाकपर्यंतच्या कामात अनेक अडचणी येत आहेत. त्यावर मात करून कामे केले जात आहे. या टप्प्यातील मोठे डोंगर फोडून उड्डाणपूल बांधले जात आहेत. तीव्र वळणे काढली जात आहेत. यामुळे कामास विलंब होत आहे, असे प्रशासन म्हणणे आहे.


