
ठाणे; विशेष प्रतिनिधी
भिवंडी शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई करत गोव्याहून अवैधरित्या आणलेला विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. नाशिक–मुंबई महामार्गावरील सोनाळे गावाच्या हद्दीत सापळा रचून एका ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये गोव्यात निर्मिती झालेल्या ‘रॉयल ब्ल्यू’ या ब्रँडच्या विदेशी दारूचे सुमारे १,४०० बॉक्स आढळून आले.
या दारूची महाराष्ट्रात विक्री करण्यास बंदी असून जप्त करण्यात आलेल्या साठ्याची किंमत सुमारे दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी ट्रकसह दारूचा साठा आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध ‘महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमां’तर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.



