
चिपळूण :- तालुक्यातील अलोरे पोफळी नाका येथे गुरांची बेकायदेशीर वाहतूक करताना पोलिसांनी कारवाई करून ७ म्हशी व १ गाय असे पशुधन तसेच ट्रक असा एकूण १४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (दि. २७) रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत बुधवारी सकाळी ६:११ वाजता गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी विशाल वसंत ओसवाल (४०, व्यवसाय कापड दुकान, रा. अलोरे मार्केट) यांनी फिर्याद दिली असून, आरोपींची नावे इसहाक अब्दल्ला महालुनकर (५७, रा. खेड भोस्ते) व राजेंद्र बाबू तांबे (५०, रा. शिव, खेड) अशी आहेत. आरोपींनी वाहतूक परवाना नसताना जनावरांची वाहतूक केली. जनावरांना पाणी अथवा खाद्य न देता अत्यंत दाटीवाटीने भरून, स्वतंत्र विभाजनाची कोणतीही व्यवस्था न करता आखूड दोरीने बांधून वाहतूक करण्यात येत होती.
या कारवाईत मुर्रा क्रॉस जातीच्या ७ म्हशी, १ जर्सी जातीची दुभती गाय तसेच ट्रक असा एकूण १४ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी आरोपींवर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र पोलिस अधिनियम, प्राण्यांचे परिवहन नियम, केंद्रीय मोटार वाहन अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात असे प्रकार वाढले असल्याने पोलिसांना याबाबत सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

जाहिरात



