दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रसुनेत्रा पवार होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, आज संध्याकाळी शपथविधी

सुनेत्रा पवार होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, आज संध्याकाळी शपथविधी

मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी आज शनिवारी त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची निवड होणार आहे. ही निवड झाल्यानंतर लगेच संध्याकाळी उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांचा लोकभवनावर शपथविधी होणार आहे. सुनेत्रा पवार या राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील.
सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यासाठी पक्षाच्या आमदारांची दुपारी दोन वाजता विधानभवनात बैठक होणार आहे. या बैठकीत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले जाईल. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधिमंडळ पक्षनेतेपद आणि उपमुख्यमंत्रिपदावर तातडीने नियुक्ती करण्याबाबत पक्षात चर्चा झाली. ही पदे जास्त काळ रिक्त ठेवली तर वेगळ्या चर्चांना तोंड फुटेल अशी शक्यता लक्षात घेऊन पक्षाने हा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी दिवसभर यासंदर्भात राजकीय हालचाली झाल्या. उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. यामुळे रिक्त होणाऱ्या जागी पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत काय चर्चा ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत अजित पवार यांच्याकडील वित्त आणि नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक विकास, क्रीडा आणि युवक कल्याण ही खाती पक्षाकडे कायम राहावीत, याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चर्चा केली. वित्त आणि नियोजन खाते मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतील, अशी चर्चा आहे. मात्र, वित्त आणि नियोजन खाते आपल्याच पक्षाकडे ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही आहेत. तसेच, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिक्त आहे. उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवेळी रिक्त असलेले हे मंत्रिपद भरण्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केल्याचेही समजते.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!