
चिपळूण :- जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणे, वाहतूक व वापर करणे यावर पोलिसांनी कारवाई तीव्र केली असून सावर्डे पोलिस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. आगवे (ता. चिपळूण) येथून अवैध शस्त्रसाठा जप्त करून एका संशयितास अटक करण्यात आली आहे. महेश महेंद्र जाधव (३५ , रा. बौद्धवाडी) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी एक सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक, एक जुनी नादुरुस्त ठासणीची बंदूक व ९ जिवंत काडतुसे असा एकूण ७०,९०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक १८ मार्च रोजी गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार आगवे येथील महेश जाधव हा अवैध दारू विक्रीसोबतच शस्त्र बाळगत असल्याची माहिती मिळाली. या पथकाने सापळा रचून छापा टाकला असता संबंधित व्यक्ती घराच्या मागील बाजूस गोठ्याजवळील लाकडी खोपटीत बंदुकीची साफसफाई करताना आढळला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक नितीन बगाटे व अप्पर पोलिस अधिक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पोलिस अंमलदार विजय आंबेकर, दीपराज पाटील, विवेक रसाळ व अतुल कांबळे यांनी सहभाग घेतला.

जाहिरात



