
ठाणे; प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर येथील कासारवडवली आणि मुंब्रा परिसरात रविवारी दोन वेगवेगळ्या दुर्घटना घडल्या. घोडबंदर येथील ठाणे महापालिकेच्या इमारतीत लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तीन मुले अडकली होती. अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना काही मिनिटांत सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. तर दुसऱ्या घटनेत मुंब्रा परिसरात घरातील छताचा प्लास्टर अचानक कोसळून एका ३ वर्षांच्या मुलीसह एक पुरुष जखमी झाला. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनांमुळे परिसरातील इमारतींच्या देखभाल व सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.


