
डोंबिवली ; संतोष माने
डोंबिवली पश्चिम परिसरात बेकायदा बांधकामे आणि मोकळ्या मैदानांवर अनधिकृत बाजार भरवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे समोर आले आहे. या प्रकारांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका च्या ह प्रभाग विभागाला वरिष्ठ स्तरावरून कारवाईचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती असूनही प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील रहिवासी आणि तक्रारदार यांच्यात असंतोष वाढत आहे.
कोपर आणि सरोवर नगर या भागांतील सुमारे ३०० बेकायदा चाळींवर कारवाई करण्याची मागणी करत एक तक्रारदार मागील १५ दिवसांपासून आझाद मैदान येथे बेमुदत उपोषणाला बसला आहे. या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढत असूनही परिस्थितीत अद्याप कोणताही बदल झालेला नाही.


