
पालिका प्रशासन अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणार?
ठाणे ; विशेष प्रतिनिधी
दिवा-आगासन रोड हा दिव्यातील वाहतुकीचा रहदारीचा रस्ता मानला जातो. मात्र, याच रोडवरील दातीवली चौक (ग्लोबल स्कूल) परिसरात दर शनिवारी भरणाऱ्या बेकायदेशीर आठवडी बाजारामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. रस्ता गिळंकृत करून बिनधास्त थाटलेल्या या बाजारामुळे शनिवारी कामानिमित्त किंवा वैयक्तिक कामासाठी वाहने घेऊन बाहेर पडणाऱ्या ठाणेकर-दिवेकरांना तासनतास कोंडीत अडकून पडावे लागत आहे. प्रशासकीय अधिकारी आणि फेरीवाल्यांच्या कथित ‘साटेलोट्या’मुळेच सामान्य वाहनचालकांचा हा त्रास संपत नसल्याचा संताप व्यक्त होत आहे.
शनिवार हा विकेंडचा पहिला दिवस असल्याने अनेक नागरिक खरेदीसाठी किंवा कामानिमित्त वाहने घेऊन बाहेर पडतात. तसेच खासगी नोकरी करणाऱ्या चाकरमान्यांची वर्दळही मोठ्या प्रमाणावर असते. मात्र, दातीवली चौकात आठवडी बाजाराने रस्त्याचा बहुतांश भाग व्यापल्याने मुख्य रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे. परिणामी, दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. जे अंतर पार करण्यासाठी एरवी ५ ते १० मिनिटे लागतात, तिथे शनिवारी अर्धा-अर्धा तास वाहने रेंगळत असतात. यामुळे इंधनाचा आणि वेळेचा प्रचंड अपव्यय होत आहे. कर’ भरूनही रस्त्यावर ‘त्रास’
“आम्ही वेळेवर टॅक्स भरतो, तरीही आम्हाला रस्त्यावर चालायला किंवा गाडी चालवायला जागा मिळत नसेल, तर प्रशासनाचा काय उपयोग?” असा संतप्त सवाल स्थानिक वाहनचालक करीत आहेत. शनिवारी वाहने बाहेर काढणे म्हणजे जणू काय एक प्रकारची शिक्षाच झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. अरुंद रस्त्यामुळे होणाऱ्या किरकोळ अपघातांवरून चालकांमध्ये वादावादीचे प्रसंगही नित्याचे झाले आहेत.
स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. महापालिकेचे कर्मचारी आणि संबंधित अधिकारी आठवडी बाजाराकडून मिळणाऱ्या ‘हप्त्या’साठीच या बेकायदेशीर प्रकाराला अभय देत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. कारवाईच्या नावाखाली केवळ दिखावा केला जातो, मात्र त्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’ होते. अधिकाऱ्यांच्या खिशाला मिळणारी ‘गरमी’ आणि रस्त्यावर वाहनचालकांना होणारा ‘त्रास’ याचे गणित काही केल्या सुटत नाही, अशी चर्चा दिव्यात रंगली आहे.
अतिक्रमण विभागाची एका बाजूला कारवाई तर दुसऱ्या बाजूला पैश्यासाठी लाचारी?

वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासन यांनी एकमेकांकडे बोट दाखवण्यापेक्षा, दातीवली चौकातील हा रस्ता अतिक्रमणमुक्त करून वाहनचालकांचा श्वास मोकळा करावा, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा, सहनशीलतेचा अंत पाहणाऱ्या प्रशासनाला जनआंदोलनाला सामोरे जावे लागेल, असे चित्र निर्माण झाले आहे.

जाहिरात



