दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्ररत्नागिरी'तुतारी 'तील चोरीचा प्रयत्न उधळला , तिकीट परीक्षक सावेकरांचे प्रसंगावधान, दोघे ताब्यात

‘तुतारी ‘तील चोरीचा प्रयत्न उधळला , तिकीट परीक्षक सावेकरांचे प्रसंगावधान, दोघे ताब्यात

रत्नागिरी : योगेश मुळे

कोकण रेल्वेच्या ‘११००४ तुतारी एक्स्प्रेस’मध्ये होणारा चोरीचा मोठा प्रयत्न तिकीट परीक्षक सचिन सावेकर यांच्या प्रसंगावधानामुळे हाणून पाडण्यात आला. त्यांच्या धाडसी आणि तत्पर कारवाईमुळे दोघा संशयित चोरट्यांना अटक करण्यात आली असून, रेल्वे प्रशासनाने त्यांचा सन्मान करत – १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले आहे.
सोमवार १६ रोजी पहाटे सुमारे ४.३० वाजता तुतारी एक्स्प्रेसने रोहा रेल्वे स्थानक ओलांडल्यानंतर ही घटना घडली. तिकीट परीक्षक सचिन सावेकर हे एस-२, एस-३ आणि एस-४ डब्यांमध्ये नियमित तिकीट तपासणी करत असताना एस-२ डब्यात दोन व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना त्यांच्या नजरेत भरल्या. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता इतर प्रवाशांच्या मदतीने दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान या संशयितांनी एका महिला प्रवाशाची हँडबॅग चोरल्याचे स्पष्ट झाले. आरोपींकडून सोन्याचे मंगळसूत्र, कानातील रिंगांचे दोन जोड, एक मोबाईल फोन आणि ४ हजार ७५० रुपये रोख रक्कम असा ऐवज जप्त करण्यात आला. तक्रारदार महिलेने एका अंगठीचीही चोरी झाल्याचे सांगितले असून तिचा शोध सुरू आहे. पकडलेल्या संशयितांना पुढील कारवाईसाठी रेल्वे सुरक्षा दल (RPF) यांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांना पनवेल येथे सुपूर्द करण्यात आले आहे.
तिकीट परीक्षक सचिन सावेकर यांनी दाखवलेली जागरूकता, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा लक्षात घेऊन कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी त्यांना १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासादरम्यान कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ रेल्वे कर्मचारी किंवा आरपीएफला माहिती द्यावी. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सदैव कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही करण्यात आला आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!