
चिपळूण : प्रतिनिधी
भाजप हा केवळ कागदावरचा बलाढ्य पक्ष असून प्रत्यक्षात काम कमी आणि फोटोसेशन व रील्स बनविण्याचे उद्योग अधिक सुरू असल्याची घणाघाती टीका भाजपचे माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी केली. गलिच्छ व सूडबुद्धीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप करत उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी आपल्यावर केलेली निलंबनाची कारवाई बेकायदेशीर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
चिपळूण शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक व भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष परिमल भोसले यांनी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे आणि स्थानिक पक्षनेतृत्वावर आरोपांची झोड उठवली. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, या पार्श्वभूमीवर भोसले यांनी थेट इशाराच दिला आहे.
भोसले म्हणाले, “15 नोव्हेंबर 2025 रोजी मी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर तब्बल चार महिन्यांनी निलंबनाची कारवाई कशी काय होते? अजूनही मला निलंबनाचे अधिकृत पत्र मिळालेले नाही.” तसेच आपण दक्षिण रत्नागिरीचे पदाधिकारी असताना उत्तर रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षांना आपल्यावर कारवाई करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सूडबुद्धीच्या राजकारणाचा आरोप
ही कारवाई पूर्णपणे सूडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप करत भोसले म्हणाले, “लांजा, संगमेश्वर, देवरुख, रत्नागिरी येथे भाजपचेच काही पदाधिकारी अपक्ष लढले, त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? फक्त आमच्यावरच का?” असा थेट सवाल त्यांनी केला.
काम कमी, फोटोसेशन अधिक
भोसले यांनी सांगितले की भाजपची विचारधारा चांगली असली तरी स्थानिक पातळीवर कामापेक्षा फोटोसेशन आणि रील्स यांनाच अधिक महत्त्व दिले जात आहे. “कमळ छातीवर लावलं म्हणजे कोणी निष्ठावंत होत नाही. जिल्ह्यात भाजपची स्वबळावर निवडून येण्याची ताकद नाही. युतीच्या माध्यमातूनच उमेदवार निवडून येत आहेत,” अशी टीकाही त्यांनी केली.
पॉक्सो प्रकरणावर सवाल
भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस मंदार कदम यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचा उल्लेख करत, अशा गंभीर प्रकरणात कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्न भोसले यांनी उपस्थित केला. यासंदर्भात पुरावे सादर करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
‘चार कामांचे’ खुले आव्हान
भोसले यांनी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांना आठ दिवसांची मुदत देत चार कामे मार्गी लावण्याचे खुले आव्हान दिले.
चिपळूण शहरातील उड्डाणपूल कापसाळ रेस्ट हाऊसपर्यंत वाढवून त्यासाठी 100 कोटींची तरतूद करणे.
2021 च्या महापुरानंतर शहरातील गाळ काढण्यासाठी 100 कोटींचा निधी मंजूर करणे.
मराठा समाजाला कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी शासन निर्णय काढणे.
शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर तातडीने नियोजन करणे.
“केंद्रात सत्ता, राज्यात मुख्यमंत्री आणि मंत्री तुमचेच आहेत, मग ही कामे आठ दिवसांत का होऊ नयेत?” असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.
‘अॅक्शनला रिऍक्शन देऊ’
भोसले यांनी शेवटी स्पष्ट इशारा दिला की, “आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे कार्यकर्ते आहोत. आमच्यावर पुन्हा आरोप झाले तर आम्ही पुराव्यानिशी पोलखोल करू. अॅक्शनला रिऍक्शन देणारच. हे तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे,” असा रोखठोक इशाराही त्यांनी दिला.


