
मुंबई : प्रतिनिधी
मतीमंद युवती कु. मानवता उर्फ वंशिका रविकांत डोंगरे हिच्यावर झालेल्या कथित मानसिक, आर्थिक छळ आणि वारस हक्क नाकारल्याच्या गंभीर प्रकरणात आता महिला मुक्ती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात संघटनेच्या अध्यक्षा सौ. कल्पनाताई मोरे लवकरच राज्याच्या मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रकरण तातडीने मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, वंशिका डोंगरे हिला गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबीयांकडून मानसिक व आर्थिक छळ सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिच्या वडिलांच्या निधनानंतर वारस हक्कातील मालमत्ता व जमिनींपासून तिला व तिच्या आईला वंचित ठेवण्यात आल्याची तक्रार संबंधितांनी शासनाकडे केली आहे. तसेच या प्रकरणात संबंधित काही व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. �
वंशिका पत्र ब्लांक_260208_131649.pdf None
या पार्श्वभूमीवर महिला मुक्ती मोर्चाने वंशिकाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला असून, शासनाने तातडीने हस्तक्षेप करून उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, वारस हक्कातील संपत्तीचा हक्क द्यावा आणि छळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका मांडली आहे.
सौ. कल्पनाताई मोरे यांनी सांगितले की, “वंशिका डोंगरे ही जन्मतः मतीमंद असून गेली अनेक वर्षे अन्याय सहन करत आहे. तिच्यासारख्या असहाय मुलीला न्याय मिळवून देणे ही समाजाची जबाबदारी आहे. आम्ही लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरण मांडणार आहोत. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”
दरम्यान, या प्रकरणात न्याय न मिळाल्यास संबंधित कुटुंब व विविध संघटनांच्या वतीने मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या घडामोडींमुळे राज्यातील महिला व सामाजिक संघटनांचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले असून, शासनाची पुढील भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात



