दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्र"ज्यांना आवाज त्रास देतो…त्यांच्यासाठी शहर शांत होतंय" कल्याणात साकारतंय अनोखं ‘ऑटिझम व्हिलेज

“ज्यांना आवाज त्रास देतो…त्यांच्यासाठी शहर शांत होतंय” कल्याणात साकारतंय अनोखं ‘ऑटिझम व्हिलेज

कल्याण ; प्रतिनिधी

ज्यांना आवाज त्रास देतो…त्यांच्यासाठी शहर शांत होतंय’ : कल्याणात आकाराला येतंय अनोखं ‘ऑटिझम व्हिलेज

केडीएमसीच्या उद्यान विभागाचा पुढाकार

प्रत्येक मुलाला खेळण्यासाठी, शिकण्यासाठी आणि मुक्तपणे जगण्यासाठी एक आपलीशी जागा हवी असते…पण स्वमग्न (ऑटिझम) मुलांसाठी अशी जागा शोधणं अनेक पालकांसाठी आजही मोठं आव्हान आहे. हाच विचार डोळ्यासमोर ठेवत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून एक हृदयस्पर्शी आणि अनोखा उपक्रम राबविण्यात येत असून शहरात लवकरच ‘ऑटिझम व्हिलेज’ आकार घेत आहे.

महापालिका क्षेत्रातील बारावे (रिंग रोडलगत) परिसरात सुमारे तब्बल १२ हजार ७७२ चौ.मी जागेमध्ये हा प्रकल्प उभारला जात आहे. या विस्तीर्ण उद्यानात एका बाजूला खास स्वमग्न मुलांसाठी सुरक्षित, शांत आणि उपचारक्षम वातावरण असलेले ऑटिझम व्हिलेज, तर दुसऱ्या बाजूस सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं उद्यान विकसित करण्यात येत आहे.

या ऑटिझम व्हिलेजमध्ये मुलांच्या संवेदनांना समजून घेणारी आणि त्यांना हळुवारपणे जगाशी जोडणारी रचना करण्यात आली आहे. ज्यामध्ये सेन्सरी गार्डन, सेन्सरी पाथवे, विशेष खेळणी, ध्यान केंद्र आणि थेरपी सेंटर अशा सुविधा असणार आहेत. त्यामुळे केवळ कल्याण-डोंबिवलीच नव्हे तर संपूर्ण एमएमआर प्रदेशातील ऑटिझमग्रस्त मुलांना योग्य उपचार आणि सुरक्षित वातावरण मिळणार आहे.

उर्वरित उद्यानात नागरिकांसाठी भव्य बाग, आधुनिक कारंजे, बास्केटबॉल कोर्ट, अॅम्फीथिएटर, मियावाकी जंगल, स्केटिंग रिंग, जॉगिंग व सायकलिंग ट्रॅक, कॅफेटेरिया आणि सौरऊर्जेवर चालणाऱ्या सुविधा उभारल्या जात आहेत. म्हणजेच हे उद्यान सर्वांसाठी आनंदाची जागा ठरणार आहे.

विशेष म्हणजे हा प्रकल्प Mere Realty या विकासकांमार्फत Amenity TDR मधून साकारला जात आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी स्थळ पाहणी करून २ एप्रिल – जागतिक ऑटिझम जागरूकता दिनापर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून आठवड्याला आढावा घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या पाहणीवेळी नगररचना संचालक संतोष डोईफोडे, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव तसेच विकासक आणि सल्लागार उपस्थित व होते.

हा प्रकल्प केवळ एक उद्यान नसून वेगळ्या जगामध्ये जगणाऱ्या मुलांना समाजाशी जोडणारा एक संवेदनशील पूल आहे. कारण काही मुलांना फक्त खेळण्याची जागा नव्हे, तर समजून घेणारी जागा हवी असते…आणि ती देण्याच्या दिशेने कल्याण डोंबिवली महानगरपालिका एक मोठं पाऊल टाकत आहे.

जाहिरात

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!