
डोंबिवली ; विशेष प्रतिनिधी
डोंबिवलीजवळील पलावा चौक येथील शिळफाटा रस्त्यावरील एक्सपेरिया मॉलमधील एका कपडा दुकानात गेल्या महिन्यात दोन इसम सकाळच्या वेळेत आले. आम्हाला चांगल्या दर्जाचे टी शर्ट खरेदी करायचे आहेत, असे ते दुकानातील मंचकाजवळील कामगारांना सांगू लागले. विविध प्रकारचे टी शर्ट तपासून ते वेश बदलण्याच्या बंदिस्त खोलीत जाऊन टी शर्ट योग्य होतो की नाही याची चाचपणी करत होते. या गडबडीत दुकातील कामगारांची नजर चुकवून भामट्यांनी महागडे शर्ट, टी शर्ट चोरून पलायन केले.
प्रत्यक्षात दोन्ही भामट्यांनी वेश बदलण्याच्या खोलीत जाऊन एकाने चांगल्या दर्जाचा टी शर्ट, दुसऱ्याने महागडा शर्ट आपल्या सदऱ्याच्या पाठीमागील बाजुला दडवून ठेऊन दुकानादाराची फसवणूक केली होती. दुकानात विविध प्रकारचे टी शर्ट, शर्ट तपासून पाहिल्यानंतर ते आपणास
पसंत नाहीत असा अविर्भाव आणून ते दुकानातून निघून गेले होते. मंचकावर या दोन्ही भामट्यांनी दाखविण्यासाठी काढलेले टी शर्ट, शर्ट कामगारांनी दुकानाच्या दर्शनी खाच्यात ठेवले होते. काही वेळाने दुकानात दुकानाच्या व्यवस्थापक स्वप्नाली रणपिसे आल्या. त्या दुकानातील साठ्याची माहिती घेत असताना कामगारांना दुकानातील साठ्यात मंचकावर काढून ठेवलेले पाच शर्ट, चार टी शर्ट कमी असल्याचे
आढळले. आम्ही दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यावेळी आम्हाला दोन्ही भुरट्यांनी आपल्या शर्टच्या पाठीमागील भागात युएस पोलो कंपनीचे एकूण २२ हजार रूपये किमतीचे नऊ शर्ट, टी शर्ट नेले असल्याचे आढळले. दुकानाचे मालक, व्यवस्थापक यांच्या सूचनेवरून ही तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे, असे तक्रारदाराने म्हटले आहे.


