
मुंबई :- प्रतिनिधी
मुंबईतील वाहतूक कोंडी कायमच चर्चेचा विषय असतो. सकाळी एका ठराविक वेळेनंतर अगदी जवळचे अंतर पार करायलाही मोठा कालावधी लागतो. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून आता मुंबई महानगरपालिकेने सर्वसमावेशक आराखडा तयार केल्याचे म्हटले जात आहे. या योजनेचा मुख्य भाग म्हणून मुंबईत येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स आता मुंबई शहराच्या वेशीवरच रोखल्या जाणार आहेत.
मुंबई शहरात दररोज होणारी वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने एक महत्त्वाकांक्षी आणि धाडसी पाऊल उचलले आहे. मुंबईत दररोज येणाऱ्या हजारो खासगी ट्रॅव्हल्समुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ही वाहने आता मुंबईच्या वेशीवर म्हणजे दहिसरला थांबवण्यात येणार आहेत. या बसमधून येणाऱ्या प्रवाशांना मुंबईच्या विविध भागात जाण्यासाठी मेट्रो, बेस्ट आणि कॅबची सुविधा कनेक्ट करून दिली जाणार आहे.
आमच्या न्यूजलेटरसाठी साईन-अप करा
मुंबई पालिकेने आता एक मास्टर प्लॅन तयार केला
कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली आणि उत्तर भारतातून दररोज हजारो खासगी आणि आंतरराज्य बस मुंबईत प्रवेश करतात. या बस बोरिवली, कांदिवली, अंधेरी, वांद्रे अशा मुख्य रस्त्यांवर किंवा उड्डाणपुलांखाली अनधिकृतपणे पार्क केल्या जातात. यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, एस. व्ही. रोड आणि लिंक रोडवर वाहनांची कोंडी होते. प्रवाशांसाठी या बसेस रस्त्यातच थांबत असल्यामुळे इतर वाहनांचा वेग मंदावतो. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पालिकेने आता एक मास्टर प्लॅन तयार केला आहे.
मुंबईत प्रवेश करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स आणि आंतरराज्य बसेसमुळे अंतर्गत रस्त्यांवर होणारी कोंडी फोडण्यासाठी पालिकेने १ हजार २३२ कोटी रुपयांचा सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे. या अंतर्गत मुंबईच्या वेशीवर उतरणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी दहिसर नाक्यावर थ्री स्टार हॉटेल, पार्किंग हब, फूड प्लाझा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेले जकात नाके २०१७ मध्ये बंद करण्यात आले. दहिसर आणि मानखुर्द जकात नाके ओस पडले आहेत. या दोन्ही जकात नाक्यांवर सोयी सुविधांसह थ्री स्टार, फाईव्ह स्टार हॉटेल, शॉपिंग सेंटर, पार्किंग हब अशा सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
दहिसर चेक नाक्यावर सुमारे १८,६०४ चौरस मीटर जागेवर हे भव्य हब उभारले जाईल. मुंबई बाहेरून येणाऱ्या सर्व खासगी आणि आंतरराज्य लक्झरी बसना मुंबई शहराच्या अंतर्गत भागात प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी असेल, असे म्हटले जात आहे. या सर्व बस दहिसर येथेच थांबवल्या जातील. या हबमध्ये एकाच वेळी ४५० आंतरराज्य बसेस पार्क करण्याची क्षमता असेल. याशिवाय, मुंबईकर आणि अन्य प्रवाशांसाठी १,४०० खासगी कार पार्क करता येतील, असे अत्याधुनिक बहुमजली पार्किंग उभारले जाणार आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करून थकलेल्या प्रवाशांसाठी, तसेच चालक आणि वाहकांसाठी या हबमध्येच सर्व सुविधायुक्त थ्री-स्टार हॉटेल आणि विश्रामगृहे बांधली जातील. तसेच रिटेल शॉपिंग मॉल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स, बँक्वेट हॉल्स आणि डिजिटल स्क्रीनसह आधुनिक प्रतिक्षालये असतील, असे म्हटले जात आहे.
विशेष म्हणजे मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता देशभरातून येणाऱ्या पॅसेंजर खासगी ट्रॅव्हल बस दहिसर व मानखुर्द चेक नाक्यांवरच रेड सिग्नल मिळणार आहे. खासगी ट्रॅव्हल बस या ठिकाणी हॉल्ट घेऊन पुन्हा परततील. दहिसर नाक्यासाठी ९९२ आणि मानखुर्द जकात नाक्यासाठी २४० कोटी रुपयांचा खर्च आहे. या येणाऱ्या सुविधांमुळे मुंबईत वाहतूककोंडी तर फुटेलच शिवाय खासगी बसच्या मुंबईतील पार्किंगचा प्रश्न सुटेल, असा दावा करण्यात येत आहे.
खाजगी बस दहिसरलाच थांबणार असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून या हबला ‘मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी’ दिली जाणार आहे. प्रवासी येथून पुढे जाण्यासाठी मेट्रो, बेस्ट बस, टॅक्सी, रिक्षा हा पर्याय अवलंबू शकतात. हे ट्रान्सपोर्ट हब मुंबई मेट्रो मार्ग ९ (दहिसर ते मिरा-भाईंदर) आणि मेट्रो मार्ग ७ (दहिसर ते अंधेरी पूर्व) यांच्या पांडुरंग वाडी इंटरचेंज स्टेशनला थेट जोडलेले असेल. त्यामुळे प्रवासी बसमधून उतरून थेट मेट्रो पकडू शकतील. मुंबईच्या विविध भागांत जाण्यासाठी या हबमधून थेट विशेष बेस्ट बसेस सोडल्या जातील. ओला, उबर, काळी-पिवळी टॅक्सी आणि रिक्षा यांच्यासाठी स्वतंत्र पिक-अप आणि ड्रॉप-ऑफ झोन तयार केले जातील. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहनांचा ताण ५० टक्क्यांहून कमी होईल. बोरिवली ते वांद्रे दरम्यान प्रवासाचा वेळ वाचेल. शेकडो मोठ्या डिझेल बस शहराबाहेर थांबल्याने मुंबईतील प्रदूषणात मोठी घट होईल. हॉटेल, मॉल्स आणि पार्किंगच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळू शकेल, अशी योजना असल्याचे सांगितले जात आहे.
दहिसर नाक्यावर सध्या १८८६९ चौरस मीटर जागा आहे, तर मानखुर्द जकात नाक्यावर २९,७७४ चौरस मीटर जागा आहे. या दोन्ही ठिकाणी मोक्याच्या जागांचा सद्यस्थितीत पालिकेला कोणताही उपयोग होत नाही. आता सुविधा झाल्याने मुंबईत वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार असून पालिकेला महसूलही मिळणार आहे. या ठिकाणी सीएनजी, पेट्रोल पंप, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग अशा आवश्यक इंधनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे समजते.


