
कल्याण : प्रतिनिधी
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा टांगा पलटी झालाय येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्यांचे घोडेही फरार होतील अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जोरदार टोला लगावला. तसेच सचिन पोटे एक लढवय्या कार्यकर्ता असून जिथे काम केले तिकडे प्रामाणिकपणे केले अशा शब्दांत शिवसेनेत प्रवेश केलेल्या सचिन पोटे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावर झालेल्या जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यात सचिन पोटे, जान्हवी पोटे, मनसेचे माजी नगरसेवक कौस्तुभ देसाई, कस्तुरी देसाई यांच्यासह काँग्रेस, मनसे आणि उबाठा पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेत पक्षप्रवेश सोहळ्यात निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला.

त्यांच्या टिका, टोमण्यांकडे आपण लक्ष देत नाही…
राज्यातील जनतेच्या विकासासाठी काम करत असताना आपल्यावर कोण टिका करतंय, टोमणे मारत आहे, याकडे अजिबात लक्ष देत नाही. आरोपाला आरोपातून नाही कामातून टीकेला टीकेतून नाही तर कामातून उत्तर देतो अशा शब्दांत त्यांनी आपल्यावर होणाऱ्या टीकाकारांना नाव न घेता प्रत्युत्तर दिलेआ
खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची टीम आणखी मजबूत…
येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महायुतीचीच टीम जिंकणार ही काळया दगडावरची रेघ असून सचिन पोटे यांच्या पक्षात येण्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची टीम आणखी मजबूत झाली आहे. या टीममध्ये आधीच धोनी, विराट, रोहित होते त्यात आता सचिन पोटे यांचीही एन्ट्री झाली असून येणाऱ्या निवडणुकीत आपली महायुती जिंकणार यामध्ये कोणताही संशय नसल्याचा विश्वास व्यक्त केला. कारण सर्वसामन्यांना न्याय द्यायचा असेल आणि विकास करायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही. हा कार्यकर्त्यांचा पक्ष कोणी मालक नाही, नोकर नाही. सचिन पोटे आमच्याकडे आल्याने शिवसेनेला मोठी ताकद मिळाल्याचे सांगितले.
जाहिरात



