
संगमेश्वर :- मुंबई – गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ब्रेझा कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य एकजण किरकोळ जखमी झाला आहे. ही कार मुंबईहून गणपतीपुळे येथे जात होती
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त वाहन ब्रेझा (क्रमांक एमएच ०४ जेव्ही ७१९८) हे भरधाव वेगात येत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. चालकाचा कारवरील ताबा सुटून भीषण अपघात झाला. कार रस्त्याच्या बाजूला लावलेल्या लोखंडी गर्डरमध्ये घुसून तो गर्डर चालक सलिम सुलतान खान (वय ४६, रा. वसई) यांच्या मांडीमध्ये घुसून चालक
गाडीच्या बाहेर फेकला गेला व जागीच गतप्राण झाला. बाजूला बसलेला झोपेत असणारा त्याचा मित्र सुखविंदर संधू (वय ४६) रा. मिरारोड हा किरकोळ जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले व चालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला.


