
ठाणे ; विशेष प्रतिनिधी
कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील टिटवाळा परिसरात अनधिकृत चाळींवर अखेर महापालिकेने बुलडोजर चालवत तोडक कारवाई सुरू केली आहे. बल्याणी आणि मांडा परिसरात शासनाच्या जागांवर चाळमाफियांकडून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. स्वस्त घरांचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांना ही घरे विकण्यात आली. मात्र आता या बांधकामांवर कारवाई सुरू झाल्याने शेकडो कुटुंबे बेघर झाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, चाळमाफिया आणि महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमतातून हे संपूर्ण रॅकेट सुरू आहे. आधी अनधिकृत चाळी उभारल्या जातात, त्यानंतर त्या सर्वसामान्यांना विकल्या जातात आणि काही वर्षांनी त्यांच्यावर तोडक कारवाई केली जाते.
केडीएमसीकडून सुरू करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनेकांनी कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासनाने ही कारवाई नियमानुसार सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अनधिकृत बांधकामे सुरू असताना संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष का केले, याची चौकशी करण्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे.
भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८



