
मुंबई : विशेष प्रतिनिधी
मंत्रालयात पुन्हा एकदा लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला असून, अर्थ आणि नियोजन विभागाचा मासा गळाला लागला आहे. निधी मंजूर करून देण्यासाठी तब्बल ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना कक्ष अधिकारी विलास लाड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खारघर परिसरातून अटक केली.
ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देण्याच्या बदल्यात लाड याने संबंधित व्यक्तीकडे मोठी रक्कम मागितली होती. तक्रारदाराने ९ मार्च २०२६ रोजी एसीबीच्या मुंबई कार्यालयात लाडने लाच मागितल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर १६ मार्च २०२६ रोजी केलेल्या पडताळणीत संबंधित अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्याचे आणि ती स्वीकारण्यास सहमती दर्शवल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ५ एप्रिल २०२६ रोजी खारघर, नवी मुंबई येथे सापळा रचण्यात आला व लाड याला पकडण्यात आले.
या कारवाईमुळे मंत्रालयातील इतर लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे, मार्चमध्ये एसीबीने कारवाईचा धडाका लावला होता, मार्च एंडमुळे ही कारवाई होत असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात होती. मात्र, आता एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात एसीबीने पुन्हा एकदा आपला मोर्चा थेट मंत्रालयात वळवला आहे.
आधीच्या घटनेत मंत्रालयातच लिपिकाला अटक
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील क्लर्कला ५० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. एसीबीने त्याला मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून अटक केली होती.


