
कल्याण ; अमित सावंत
साखरझोपेचा गैरफायदा घेऊन हॉटेलमध्ये चोरी करण्याचा डाव एका ट्रॅव्हल्स बुकिंग एजंटला चांगलाच महागात पडला. कल्याण स्टेशनजवळील दीक्षा हॉटेलच्या छतावरून चोरीच्या उद्देशाने खाली उतरणाऱ्या तरुणाला कामगारांनी रंगेहाथ पकडून थेट महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात दिले. शुक्रवार २९ मे रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हा थरार घडला.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव स्वप्नील सुनील घाडगे (वय ३३) असून तो कल्याण पश्चिमेकडे रामबाग लेन नं. ०६ मधील रिजन्सी होम सोसायटीत राहतो. तो एका ट्रॅव्हल्स ऑफिसमध्ये बुकिंगचे काम करतो.
शुक्रवारी पहाटे ३ वाजता स्वप्नील घाडगे दीक्षा हॉटेलच्या छतावर चोरीच्या उद्देशाने चढला. त्यावेळी हॉटेलचे कॅशियर सुधाकर शेट्टी हे हॉटेलमध्येच झोपले होते. मात्र त्यांचे काही कामगार जागे होते आणि मोबाईलवर लुडो गेम खेळत होते. छतावरून आवाज आल्याने कामगारांनी वर पाहिले असता एक अनोळखी व्यक्ती दिसली. त्यांनी तात्काळ कॅशियर सुधाकर शेट्टी यांना उठवून ही माहिती दिली. हॉटेलमधील सर्वजण गाढ झोपेत असल्याच्या समजुतीने स्वप्नील खाली उतरून चोरीचा प्रयत्न करत होता. पण सावध असलेल्या कॅशियर आणि कामगारांनी त्याला घेराव घालून पकडले आणि तात्काळ महात्मा फुले चौक पोलिसांना कळवले.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन स्वप्नील घाडगे याला ताब्यात घेतले. हॉटेलचे कॅशियर सुधाकर शेट्टी यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ट्रॅव्हल्स ऑफिसमध्ये बुकिंगची चांगली नोकरी करणाऱ्या स्वप्नीलने पहाटे ३ वाजता हॉटेलच्या छतावर चढून चोरी करण्याचा प्रयत्न कशासाठी केला ? त्याच्यावर कर्जाचा डोंगर आहे का ? की तो इतर कोणत्या गुन्ह्यात सहभागी आहे ? या सर्व प्रश्नांचा सखोल तपास महात्मा फुले चौक पोलिस करत आहेत.
भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८

जाहिरात



