
ठाणे ; विशेष प्रतिनिधी
पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोकण विभागात अवैध मद्यनिर्मिती आणि विक्रीविरोधात विशेष मोहीम हाती घेत ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मोठी कारवाई केली.
२९ मे ते २ जून या कालावधीत टाकण्यात आलेल्या या धाडीत एकूण ३१३ गुन्हे दाखल करण्यात आले असून २१३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे १ कोटी ५८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ठाणे जिल्ह्यातील दिवा, अंजूर, आगासन, उत्तन, गोराई खाडी परिसरासह विविध ठिकाणी अवैध हातभट्टी अड्ड्यांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणात दारू व साहित्य जप्त करण्यात आले, तर मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहनेही ताब्यात घेण्यात आली. अवैध मद्य व्यवसायाविरोधातील कारवाई पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे.
जाहिरात




