
ठाणे ; प्रतिनिधी
राज्यात महायुतीच्या माध्यमातून महापालिका निवडणुका लढवण्याची अधिकृत घोषणा झालेली असली, तरी ठाण्यातील भाजपमध्ये या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी उफाळून आली आहे. “आम्हाला युती नको, स्वबळावरच लढा,” अशी आक्रमक भूमिका ठाण्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्थानिक आमदार व जिल्हाध्यक्षांकडे मांडली आहे. या नाराजीमुळे महायुतीसमोर ठाण्यात मोठे आव्हान उभे राहिले आहे.

- आम्हाला युती नको, स्वबळावरच लढा,” अशी आक्रमक भूमिका ठाण्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्थानिक आमदार व जिल्हाध्यक्षांकडे मांडली आहे.
ठाण्यातील नाराजीनाट्याची मूळ कारणे मागील काही महिन्यांपासून सुरु असलेल्या भाजप-शिवसेना संघर्षाशी संबंधित आहेत. दोन्ही पक्षांनी “स्वबळावर लढा” या नाऱ्याखाली कार्यकर्त्यांना मोर्चेबांधणीसाठी प्रेरित केले होते. अनेक प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक केली गेली होती, त्यामुळे अचानक युती जाहीर झाल्याने अनेक इच्छुक कार्यकर्त्यांची संधी हुकण्याची शक्यता निर्माण झाली.
भाजप कार्यकर्त्यांनी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि शहराध्यक्ष संदीप लेले यांची भेट घेऊन लेखी निवेदने दिली आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी तर युती झाल्यास निवडणूक काम न करण्याचा इशाराही दिला आहे. यामागचा मुख्य मुद्दा असा आहे की, प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळावी आणि भाजपची ठाण्यातील ता राहावी. याबाबत जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितले की, “कार्यकर्त्यांची भावना स्पष्ट आहे – युती नको. मात्र शेवटी वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य करावा लागेल. नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत घालण्याचा आम्ही प्रयत्न करू,” असे त्यांनी म्हटले आहे.



